जंगलातून आलेल्या एका अस्वलाने चक्क दुकानात घुसून फ्रीजरमधील दूध पिल्याची घटना उघडकीस आली आहे.
राजस्थानातील माऊंट अबू येथील जंगलातून शहरी भागात वन्य प्राणी आल्याच्या अनेक घटना घडत असतात. सध्या अशीच एक घटना पुन्हा घडली आहे. मात्र, यावेळी जंगलातून आलेल्या एका अस्वलाने चक्क दुकानात घुसून फ्रीजर उघडलं आणि त्यामध्ये ठेवलेले दूध पिल्याची घटना घडली आहे. खरं तर, मागील काही काळापासून या परिसरात वन्य प्राणी अनेक वेळा दिसल्याचे सांगण्यात येत आहे. खाण्यापिण्याच्या शोधात ही जनावरे मानवी वस्तीमध्ये येत असून अनेकवेळा दुकानाती किंवा कचऱ्याच्या ढिगातील पदार्थ खाताना दिसत असतात. या घटनेची माहिती नागरिकांनी प्रशासनालाही कळवली आहे. कारण शहरी भागात वन्य प्राण्यांचा वावर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आता एक अस्वल दुकानात शिरल्याच्या घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे.
अस्वलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओतील अस्वल काही खायला मिळेल का याच्या शोधात असल्याचं दिसत आहे. यावेळी तो एका दुकानात शिरतो आणि थेट फ्रीजर उघडतो. यावेळी तो फ्रिजरमधील दूधाची पिशवी बाहेर काढतो आणि पिशवीतील दूध प्यायला सुरुवात करतो. अस्वल दुध पितानाची सर्व घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याच घटनेचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत कुत्र्यांच्या जोरजोरात भुंकण्याचा आवाजही येत आहे.
दरम्यान, या घटनेत अस्वलाने कुणालाही इजा केली नाही. मात्र, शहरात वन्य प्राण्यांचा सतत वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक वेळा वन्य प्राण्यांमुळे लहान-मोठी दुकाने व वस्तूंचेही नुकसान होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. तर काही दिवसांपूर्वीही एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये लोक अस्वलाला पळवून लावताना दिसत होते.
0 Comments