सोनपावलांनी घरोघरी आज गौराईचे आगमन !
मी ज्ञानेश्वर मेटकर 3D News पुसद.
पुसद : कुटुंबात सुख , समृद्धी , भरभराट घेऊन येणाऱ्या ज्येष्ठा कनिष्ठा अर्थात गौराई महालक्ष्मीचे आज ता .३ सोनपावलांनी आगमन होत आहे . विघ्नहर्ता गणरायाच्या पाठोपाठ तीन - चार दिवसांनी येणाऱ्या गौराईच्या आगमनाबद्दल कुटुंबात नेहमीच उत्सुकता असते . गौरीचा साजशृंगार , आरास आणि त्या जोडीला महापूजा व फराळ करण्यात अवघे कुटुंब दंग असल्याचे चित्र आज शहर व परिसरात पाहायला मिळाले.गणरायाच्या प्रतिष्ठापनेमुळे शहरात सध्या सर्वत्र हर्षोल्हासाचे वातावरण आहे . त्यातच आता आजपासून गौराईचे आगमन होत असल्याने ज्या कुटुंबामध्ये गौराई विराजमान होते , त्या कुटुंबात आनंद , उत्साह द्विगुणित होत आहे . गौरीची सर्व तयारी पूर्ण झालेली असल्याने सारेच जण गौरींची आतुरतेने वाट पाहत आहेत . गौरी तीन दिवस माहेरवाशिणी म्हणून येतात . त्यात पहिल्या दिवशी आगमन , दुसऱ्या दिवशी महापूजा , मिष्टान्नाचे जेवण व त्यानंतर प्रसादवाटप , हळदीकुंकू , तर तिसऱ्या दिवशी पूजन , दही , दुधभातांचा नैवद्य दाखवून गौरी विसर्जन केले जाते . गौरी म्हणजे संपत्तीची देवता , लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते . त्यामुळेच घरात आगमनावेळी गौरींचे ज्येष्ठा - कनिष्ठा असे दोन मुखवटे ताम्हणात घेऊन रांगोळीच्या पावलांनी वाजतगाजत बाहेरून तिला घरात आणले जाते . त्या वेळी ' गौरी कशाच्या पाऊली आली , सोन्या - मोत्याच्या पाऊली आली ' असेही म्हटले जाते .
0 Comments