उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) एका डॉक्टरने चक्क आपल्या हॉस्पिटलमध्ये कामाला असलेल्या नर्सचा (nurse) मोबाईल स्नॅचिंग (Mobile snatching) करण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसात (Ulhasnagar Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी अवघ्या 24 तासांत डॉक्टरसह इतर दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी बेड्या ठोकल्यानंतर या प्रकरणाचा सविस्तर उलगडा झाला. संबंधित प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
कॅम्प नंबर एकच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये फिर्यादी महिला नर्स काम करते. तिला 4 एप्रिलपासून सुट्टी देण्यात आली होती. मात्र १० एप्रिलला तिला पुन्हा हॉस्पिटलमधून कामावर येण्याच्या सूचना फोन करुन देण्यात आल्या. त्यानुसार फिर्यादी महिला आपल्या बहिणीसोबत कामाला जाण्यासाठी निघाली. त्यावेळी सी ब्लॉक रोडवर एका अज्ञात व्यक्तीने तिचे केस पकडून मोबाईल जबरीने मोबाईल हिसकावून धूम ठोकली. यानंतर या फिर्यादी महिलेने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली.
पोलिसांनी 24 तासात आरोपींना पकडलं
पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून कारवाई करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आरोपीच्या शोधात होते. यासाठी पोलीस तांत्रिक बाबींचादेखील विचार करु लागले. विशेष म्हणजे तांत्रिक माहितीच्या आधारानेच त्यांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवले. त्यातून पोलिसांना आरोपीचा सुगावा लागला. विशेष म्हणजे पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी सुरुवातीला अरशद खान नावाच्या आरोपीला बेड्या ठोकल्या. अरशदने पोलिसांना चौकशीतून मोहम्मद खान या आरोपीचं नाव सांगितलं. मोहम्मद खाननेच आपल्याला मोबाईल स्नॅचिंग करायला सांगितलं असं अरशदने पोलिसांना सांगितलं. त्यामुळे पोलिसांनी मोहम्मदला बेड्या ठोकल्या.
चौकशीतून धक्कादायक माहिती उघड
पोलिसांनी आरोपी मोहम्मद खानची चौकशी केल्यानंतर पोलिसांना जी माहिती मिळाली ते ऐकून ते देखील चक्रावले. कारण फिर्यादी महिला ज्या रुग्णालयात काम करते त्याच रुग्णालयाचा डॉक्टर मोहम्मद शहाबुद्दीन शेख याने महिलेचा मोबाईल चोरी करण्याची सुपारी दिली असल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली. लाईफ केअर हॉस्पिटलचा डॉक्टर मोहम्मद शहाबुद्दीन शेख याने फिर्यादी नर्स महिलेचा मोबाईल जबरीने खेचण्यासाठी आरोपींना सुपारी दिली होती. आणि यासाठी या दोघा आरोपींना डॉक्टर मोहम्मदने दहा हजार रुपये देखील दिले होते.
याआधी 9 एप्रिल रोजी देखील या नर्सचा मोबाईल स्नॅचिंग करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र तो अयशस्वी ठरला. फिर्यादी नर्स महिलेच्या मोबाईलमध्ये डॉक्टरचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो असल्याचा संशय डॉक्टरला होता आणि त्याच कारणामुळे या नर्सचा मोबाईल जबरीने स्नॅचिंग करण्याची सुपारी डॉक्टर आणि त्याच्या सहकार्याने दिली असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
दरम्यान, याप्रकरणी आता मध्यवर्ती पोलिसांनी डॉक्टर मोहम्मद शहाबुद्दीन शेख सह इतर दोघांना अटक केलीय. तर एक आरोपीचा पोलिसांकडून अजूनही शोध सुरु आहे. आता या नर्सच्या मोबाईलमध्ये नक्की आक्षेपार्ह काही आहे का? की फक्त संशयावरून डॉक्टरने तिचा मोबाईल स्नॅचिंग करण्याची सुपारी दिली हे पोलीस तपासात समोर येणार आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सह पोलीस निरीक्षक महेश राळेभात, पोलीस राजाराम कुकले, विलास जरग, सतीश सोनवणे, गणेश बडे, महेश बगाड आणि प्रदीप खरमाडे यांनी विशेष मेहनत घेतली.

0 Comments