कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी महिलांकडे टक लावून पाहणारे लोक आपल्या देशात भरपूर आहेत. मात्र यूकेमध्येही अशा लोकांची कमतरता नाही. म्हणूनच वरिष्ठ ब्रिटीश वाहतूक पोलीस (BTP) अधिकारी डेट सुप्ट साराह व्हाईट यांनी अशा लोकांसाठी एक चेतावणी जारी केली आहे, जे एकटक एखाद्या व्यक्तीकडे पाहून त्या व्यक्तीला त्रास देतात (Stare At Women is Crime).
डीएस व्हाईट यांनी टेलिग्राफला सांगितलं की, 'एका वस्तूकडे टक लावून पाहणं हा मानवी स्वभाव आहे. मात्र, जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे टक लावून पाहत असते तेव्हा ते खूप वेगळं असतं. जर एखादा व्यक्ती म्हणत असेल की हे सामान्य आहे तर तो खोटं बोलत आहे, कारण हे विचित्र प्रकारचं लैंगिक वर्तनच आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, 'टक लावून पाहण्याच्या या सवयीबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. कारण ती वागणूक सांगते, की एखादी व्यक्ती दुसऱ्या जेंडरच्या व्यक्तीबद्दल काय विचार करते.'
आता अशा प्रकरणांमध्ये गुन्हे नोंदवले जातील, असा इशारा देत त्या म्हणाल्या की, 'आम्ही अशा प्रकरणांमध्ये अनेकदा गुन्हे दाखल केले आहेत. आता हे जास्त प्रमाणात केलं जाईल. रिपोर्टनुसार, डीएस व्हाईट यांनी सांगितलं की, ट्रान्सपोर्ट फॉर लंडनने गेल्या महिन्यात छेडछाडीच्या 'सामान्य प्रकरणां'वर जनजागृती करण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेनंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. महिलांनी सांगितलं की त्यांच्यासाठी अपस्कर्टिंग, कॅट कॉलिंग आणि सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या प्रायव्हसीबद्दल बोलणं यासारख्या घटना घडणं सामान्य आहे.
या मोहिमेच्या पहिल्या भागात ट्रेनवर पोस्टर लावण्यात आले होते, ज्यावर लिहिलं होतं की, 'एकटक बघणं लैंगिक छळ आहे आणि ते खपवून घेतलं जाणार नाही.' मात्र, अशाप्रकारे एकटक बघण्याला गुन्हेगारीमध्ये सामील केल्यानं या मोहिमेवर जोरदार टीका झाली होती.
द टेलिग्राफने ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स (ONS) च्या डेटाचा हवाला देत अहवाल दिला आहे की कोविड लॉकडाऊन संपल्यापासून संपूर्ण ब्रिटनच्या ट्रान्सपोर्ट नेटवर्कमध्ये लैंगिक छळाच्या तक्रारींमध्ये 175 टक्के वाढ झाली आहे. मार्च 2019 मध्ये 361 प्रकरणे समोर आली होती, तर आता मार्च 2020-2021 पर्यंत लैंगिक गुन्ह्यांची 995 प्रकरणं समोर आली आहेत.

0 Comments