-->

Ads

पाच वर्षाच्या चिमुकलीसोबत पित्याचं किळसवाणं कृत्य, मुंबईतील संतापजनक घटना


 अलीकडच्या काळात तरुणी, महिला आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही घटनांमध्ये तर कुटुंबातील सदस्यच सहभागी असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे. त्यामुळे महिला, मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा सातत्याने चर्चेत येत आहे. स्वतःच्या पाच वर्षांच्या मुलीच्या प्रायव्हेट पार्टला (Private Part) वारंवार स्पर्श करणाऱ्या पित्यास मुंबईतल्या विशेष न्यायालयाने (Special Court) पॉक्सो कायद्यांतर्गत पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसंच आरोपीच्या वतीनं करण्यात आलेले युक्तिवाद योग्य नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. 'आज तक'ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.

आपल्या 5 वर्षांच्या मुलीच्या प्रायव्हेट पार्टला वारंवार स्पर्श केल्या प्रकरणी मुंबईतल्या विशेष न्यायालयाने वडिलांना (Father) पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पीडित मुलीला एक विचित्र सवय असल्याचं पीडितेच्या शिक्षिकेच्या लक्षात आलं होतं. याबाबत शिक्षिकेनं तिच्या आईकडे चौकशी केली. त्यानंतर मुलीच्या आईनं तिच्याकडे विचारणा केली असता, मुलगी रडू लागली आणि तिनं वडिलांनी आपल्याला विचित्र स्पर्श केल्याचं सांगितलं. पीडितेच्या आईचा या म्हणण्यावर विश्वास बसला नाही. त्यानंतर ती आपल्या मुलीला देखरेखीसाठी बेबीसीटिंग सेंटरमध्ये (Babysitting Center) नेऊन सोडू लागली. या सेंटरच्या इन्चार्जला मुलीच्या या विशिष्ट सवयीबाबत विचारलं असता, त्यांनी याबाबत मुलीशी बोला, तिला विश्वासात घ्या, असा सल्ला दिला. त्यानंतर 22 जानेवारी 2019 रोजी पीडित मुलीच्या आईनं मुंबईतल्या मालाड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार (FIR) दाखल केली होती.

आरोपीच्या वडिलांनी आपल्या वकिलामार्फत न्यायालयाला सांगितलं, `पीडित मुलीच्या शरीरात बिलिरुबिन (Bilirubin) वाढल्याने तिच्या प्रायव्हेट पार्टला इचिंगसारखा (Itching) त्रास होत होता. त्यामुळे माझ्या मुलानं तिला स्पर्श केला असेल. याशिवाय वैद्यकीय अधिकाऱ्यांनीदेखील बिलिरुबिन वाढल्याचं सांगितलं.' त्यावर न्यायालयानं कडक भूमिका घेऊन, जर बिलीरुबिनचं प्रमाण वाढलं तर संपूर्ण अंगाला खाज यायला हवी, असंदेखील डॉक्टर म्हणाल्याचं सांगितलं.

`माझ्या पत्नीचे अन्य दोन व्यक्तींसोबत मैत्रीचे संबंध आहेत. ती रात्री उशिरापर्यंत त्या दोघांशी बोलत असते. त्यामुळे तिचं मुलीकडे दुर्लक्ष होतं. यावरून आमच्या दोघांमध्ये अनेकदा वाद झाले आहेत. माझी पत्नी माझ्यापासून वेगळी होऊ इच्छिते. मला धडा शिकवण्याची धमकी तिनं एकदा दिली होती. मी माझ्या मुलीला कधीही साधं मारलेलंदेखील नाही. मला खोट्या प्रकरणात अडकवलं जात आहे,` असं पीडितेच्या वडिलांनी न्यायालयाला सांगितलं.

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश एच.सी. शेंडे म्हणाले, `आरोपीने पीडितेवर कोणातही शारीरिक किंवा थेट हल्ला केलेला नाही. पीडितेला कोणतीही दुखापत झालेली नाही. परंतु, त्यामुळे गांभीर्य कमी होत नाही.`

`पीडितेची आई, शाळेतील शिक्षिका आणि बेबी सीटिंग सेंटरची इन्चार्ज महिला यांची साक्ष मिळतीजुळती आहे. 'माझे वडील प्रायव्हेट पार्टला स्पर्श करायचे आणि कोणाला सांगितलं तर 20 उठाबशा काढण्याची शिक्षा देईल, अशी धमकी मला देत होते,' असं पीडितेनं म्हटलं आहे. या 5 वर्षांच्या मुलीनं तिच्या आई-वडिलांमधल्या कोणत्याही प्रकारचा भांडणाचा उल्लेख केलेला नाही,` असं न्यायालयानं स्पष्ट केलं. बचाव पक्षाचे (Defendant) सर्व युक्तिवाद फेटाळून लावून न्यायालयाने आरोपीला 5 वर्षांची शिक्षा सुनावली.

Post a Comment

0 Comments