काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एका 19 वर्षीय विद्यार्थिनीचा जीव घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिने या मुलांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने त्यांनी तिला विष पाजलं.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला विष पाजण्याचं एकमेव कारण म्हणजे तिने त्या मुलांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता. मृत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून हलेना पोलीस स्टेशनमध्ये घटनेसंदर्भात एफआयआर दाखल केलं असलं तरी अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही.
पीडितेच्या वडिलांनी एफआयआरमध्ये लिहिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी भरतपूर येथील एका खासगी महाविद्यालयात शिकत होती. तिथे तिच्यासोबत शिकणारे पाच विद्यार्थी तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होते. जेव्हा पीडितेने संबंध ठेवण्यास नकार दिला तेव्हा आरोपींनी तिला विष पाजून तिची हत्या केली.
घटनेच्या संदर्भात हलेना पोलीस स्टेशनचे प्रभारी विजय सिंह यांनी सांगितलं की, बुधवारी पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून कलम 306 (आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे), 328 (विष देऊन दुखापत करणे) आणि 341 (अयोग्य कृत्ये) अंतर्गत आरोपी विद्यार्थ्यांविरुद्ध भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस सातत्याने प्रयत्न करत आहेत, मात्र सर्व आरोपी अद्याप फरार असून त्यांना लवकरच पकडण्यात येईल, असंही ते म्हणाले.
यासोबतच स्टेशन प्रभारी विजय सिंह यांनी सांगितलं की, पीडितेच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केल्यानंतर तिचा व्हिसेरा सॅम्पल जतन करण्यात आला असून तो फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसही फॉरेन्सिक अहवालाची वाट पाहत आहेत. मृत विद्यार्थिनीच्या वडिलांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, ही विद्यार्थिनी हलेना शहरात आजी-आजोबांसोबत राहत होती. तिने मंगळवारी आईला फोन करून सांगितलं की, काही महाविद्यालयीन मुलं तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत आहेत.
याशिवाय वडिलांनी असंही सांगितलं की, मुलीने तिच्या आईला बोलताना सांगितलं होतं की, ही मुलं तिच्यावर अश्लील कमेंट करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मुलगी कॉलेजमधून घरी परतत असताना आरोपी विद्यार्थ्यांनी तिचा पाठलाग करून तिला जबरदस्तीने विषारी द्रव्य पाजले. घरी आल्यानंतर विद्यार्थिनीला उलट्या होऊ लागल्यावर तिच्या आजोबांनी तिला जवळच्या रुग्णालयात नेले, तेथे उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला.
0 Comments