-->

Ads

मित्रासोबत फोटो काढण्याचा मोह जीवावर बेतला, जळगावातील हृदयद्रावक घटना, नेमकं काय घडलं?

 

तरुणांमध्ये सेल्फी आणि फोटोशूटची प्रचंड क्रेझ आहे. ते धबधबे, बंधारे, नदी किंवा समुद्र किनारी, तलाव या ठिकाणी जाऊन आपले वेगवेगळे पोज दाखवत सेल्फी काढून सोशल मीडियावर हमखास शेअर करतात. पण नदी किनारी किंवा धबधबा परिसरात फोटो काढण्याचा मोह जीवावर देखील बेतू शकतो. अशा अनेक घटना याआधी घडल्या आहेत. पण या घटनांपासून आजची तरुणाई काहीच बोध घेताना दिसत नाहीय. उलट ते तशाच चुका करतात. जळगावात अशीच एक घटना घडली आहे. या घटनेत दुर्देवाने एका 20 वर्षीय तरुणाता मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची घटना कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन प्रचंड आक्रोश केला. मुलाच्या मृत्यूच्या घटनेवर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित 20 वर्षीय तरुण हा जळगाव शहराचाच रहिवासी होता. तो आपल्या पाच मित्रांसोबत रविवारी (13 मार्च) दुपारी कांताई बंधाऱ्यावर फिरण्यासाठी गेला होता. त्याच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक मुलगा हा खूप आनंदी होता. तो खूप उत्साहात होता. त्याच उत्साहात त्याला बंधाऱ्यावर फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. पण त्याचा हाच मोह त्याच्या जीवाशी आला. बंधाऱ्यावर फोटो काढत असताना त्याचा पाय घसरला. यावेळी त्याच्यासोबत आणखी एका मित्राचा पाय घसरला आणि तोही पाण्यात पडला. यावेळी दोघांच्या एका मित्राने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याला एका मित्राला वाचविण्यात यश आलं. पण दुसऱ्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

दरम्यान, मृतक तरुणाच्या पश्चात दोन बहिणी, आई-वडील आणि आजोबा असा परिवार आहे. त्याचे वडील शहरातील मार्केटमधील इलेक्ट्रिक्लसच्या दुकानात काम करतात. मृतक तरुण हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच शुभमच्या नातेवाइकांनी घटनास्थळ गाठून आक्रोश केला.

Post a Comment

0 Comments