मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 12 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. पीडित महिलेने वांद्रे रेल्वे स्थानकातून चर्चगेटला जाणारी लोकल रात्री 11.45 वाजता पकडली. पीडित महिला ही महिलांच्या डब्यातून प्रवास करत होती.
चर्नी रोड रेल्वे स्टेशन येताच एक चैन स्नॅचरने महिलांच्या डब्यात प्रवेश केला. पीडित महिलेच्या गळ्यातील चैन पाहून त्याने ती खेचण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीने पीडित महिलेवर ब्लेडने हल्ला केला. या हल्ल्यात पीडित महिला जखमी झाली आहे.
या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महिलांच्या डब्यात प्रवेश करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून आता महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुंबई लोकल ट्रेनमध्ये चोरीच्या घटनांची वारंवार नोंद होत असल्याचं दिसून येत आहे. तसेच या घटना वाढतानाही दिसत आहेत. जवळपास तीन आठवड्यांपूर्वी नायगाव रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती. या आरोपीवर चोरीचे 10 गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं आहे. त्यापैकी बोरिवली जीआरपीकडेच पाच गुन्हे नोंद असल्याचंही समोर आलं होतं.
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईत दोन हत्यांच्या घटना समोर आल्या होत्या. एकाच दिवशी मुंबईतील वेगवेगळ्या परिसरात दोन जणांची हत्या झाल्याचं समोर आलं होतं. या घटनेने मुंबई हादरली. मुंबईतील अँटॉप हिल परिसरात एका तरुणाची हत्या झाली होती तर दुसरी घटना मुंबईतील लालबाग परिसरात घडली होती.
मुंबईतील अँटॉप हिल परिसरात एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचंही समोर आलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली होती.
0 Comments