मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) अंगडिया खंडणी प्रकरणी (Angadia Extortion case) पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी (DCP Saurabh Tripathi) यांना फरार आरोपी (Wanted) घोषित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सौरभ त्रिपाठी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कामावर आलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी सौरभ त्रिपाठी यांना फरार घोषित केल्याची बातमी 'एएनआय' संस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. विशेष म्हणजे गुन्हे शाखेने याच प्रकरणी एल. टी. मार्ग पोलीस ठाण्याचे (L T Marg police station) निरीक्षक ओम वंगाटे यांना गेल्या आठवड्यात अटक केली होती. आता उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांना फरार आरोपी घोषित करण्यात आलं आहे. संबंधित प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून सुरु असून या प्रकरणात आणखी कुणाकुणाची नावे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांच्यावर मुंबादेवी परिसरातील अंगडिया व्यावसायिकांकडून खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची दखल अपर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी घेतली. त्यांनी याप्रकरणी तक्रार केली. त्यानंतर एल. टी. मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओम वंगाटे, एपीआय नितीन कदम आणि उपनिरीक्षक समाधान जमदाडे अशा तीन अधिकाऱ्यांविरोधात खंडणी आणि लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी ओम वंगाटे यांनाही अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक ओम वंगाटे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम, पोलीस उपनिरीक्षक समाधान जमदाडे आणि इतर अंमलदारांनी 2, 3, 4 आणि 6 डिसेंबर 2021 ला पोफळवाडी परिसरातील अंगडिया व्यापार करणाऱ्यांना आयकर विभागाची भीती दाखवत पैसे उकळले. तसेच पोलिसांची वागणूक आणि पोलीस ठाण्यातील नोंद यामध्ये तफावत आढळल्याचं तपासात समोर आलं आहे. याशिवाय पोलीस निरीक्षक वंगाटे यांच्या आदेशानुसार कारवाई केल्याचे सहायक पोलीस निरीक्षक कदम आणि पोलीस उपनिरीक्षक जमदाडे यांनी त्यांच्या जबाबात सांगितले होते. पोलिसांनी संशयितांवर कारवाई करण्याच्या नावाने अंगडिया व्यापाऱ्यांवर खोटी अटकेची कारवाई केली होती, अशी माहिती तपासातून समोर आली होती.
0 Comments