-->

Ads

शिवाजी पार्कात मराठी दिग्दर्शकाचा ‘हाय व्होल्टेज ड्रामा’; या मागणीसाठी झाडावर बसून आंदोलन

 

शिवाजी पार्कात मराठी दिग्दर्शकाचा ‘हाय व्होल्टेज ड्रामा’; या मागणीसाठी झाडावर बसून आंदोलन


आज (बुधवार) सकाळी मुंबईतील शिवाजी पार्कात एका मराठी चित्रपट निर्माता-दिग्दर्शकाचा हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. शिवाजी पार्कातील एका झाडावर चढून त्याने आंदोलन केलं आहे. यावेळी त्याने सेन्सॉर बोर्डाविरोधात एक मागणी केली आहे.मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात एका मराठी चित्रपट निर्माता-दिग्दर्शक आणि अभिनेत्याने झाडावर चढून आंदोलन केलं आहे. ॲनिमल वेलफेअर बोर्डाने NOC च्या नावाखाली पैसे घेऊ नये अशी या दिग्दर्शकाची मागणी आहे. यामुळे चित्रपट प्रदर्शित करण्यास अडथळा येत असल्याचं त्याचं म्हणणं आहे. NOC च्या नावाखाली 30-30 हजार रुपयांची मागणी करू नये, असं त्याने म्हटलंय. शिवाजी पार्कातील झाडावर चढून त्याने माध्यमांसमोर ही मागणी बोलून दाखवली आहे. प्रविण कुमार मोहारे असं या चित्रपट दिग्दर्शकाचं नाव आहे. त्याला झाडावरून खाली उतरवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र आपली मागणी मांडल्याशिवाय खाली येणार नसल्याचं त्याने म्हटलंय. शिवाजी पार्कात हा ‘हाय व्होल्टेड ड्रामा’ पहायला मिळाला.

दिग्दर्शकाची मागणी काय?

“मी प्रविण कुमार मोहारे, मराठी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता आहे. ‘शिरच्छेद प्रेमाचा’ या नावाचा चित्रपट मी नुकताच बनवला आहे. 2014 मध्ये सेन्सॉर बोर्डात राकेश कुमार नावाचा सीईओ हा चित्रपट निर्मात्यांना अक्षरश: लुबाडत होता. त्याला मी अटक करून दिली आणि सेन्सॉर बोर्डातून बाहेर काढलं होतं. त्यानंतर मला पहलाज निहलानी यांनी सेन्सॉर बोर्डातून बाहेर काढलं होतं. इथपर्यंत ठीक होतं. पण चित्रपटात एक कोंबडी जरी दाखवली तरी त्यासाठी 30 हजार रुपये भरा आणि सीन पास करा, एक बैलगाडी दाखवली तरी 30 हजार भरा, गाईला गवत चारताना दाखवलं तरी 30 हजार रुपये द्या, अशी सतत मागणी केली जाते. ॲनिमल वेलफेअर बोर्डाचा हा नियम असल्याचं सेन्सॉर बोर्ड सांगतंय. निर्माते-दिग्दर्शकांना ब्लॅकमेल केलं जातंय. 30 हजार रुपये घेऊन ही लोकं कोणता नियम बाजूला करतात? चित्रपटात बैलगाड्या, कोंबड्या आणि आपली संस्कृती दाखवली तरी त्याला ते प्राण्यांवरील अन्याय म्हणतायत. मग आता आम्ही उघडी-नागडी चित्रपटं बनवायची का,” असा संतप्त सवाल या दिग्दर्शकाने केला आहे.

अग्निशमन दलाने झाडावर चढून या दिग्दर्शकाला खाली उतरवण्याचं प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना ‘मागे व्हा, मला माझी मागणी मांडू द्या’, अशी विनंती दिग्दर्शक करतोय. चित्रपटात प्राण्यांबद्दल काही सीन्स असले तर त्यासाठी ॲनिमल वेलफेअर बोर्डाकडून NOC लागते. मात्र या NOC साठी नेहमी निर्माते-दिग्दर्शकांकडून 30-30 हजार रुपये लुबाडले जातात, असा आरोप प्रवीण कुमार मोहारे यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments