-->

Ads

बेरोजगारीला वैतागला; रोज जेवण मिळावं म्हणून जायचं होतं तुरुंगात, त्यासाठी तरुणाचं भलतंच कांड

 

अटकेनंतर त्या व्यक्तीने पोलिसांना सांगितलं की तो आपला उदरनिर्वाह करण्यासाठी धडपडत आहे. त्यामुळे गुन्ह्यासाठी तुरुंगात खितपत पडल्यानंतर त्याला नियमित जेवण मिळेल अशी आशा असल्याने त्याने अधिकाऱ्यांना हा फोन केला




    13 मार्च : तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील एका 34 वर्षीय बेरोजगाराला काही दिवसांपूर्वी बॉम्बस्फोटाच्या धोक्याची खोटी अफवा पसरवल्याप्रकरणी रविवारी अटक करण्यात आली. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पोलिसांना फोन करून इरोड रेल्वे स्थानक आणि इरोड येथील मुख्य बसस्थानकावर बॉम्ब असल्याची खोटी माहिती दिली होती.

    अटकेनंतर त्या व्यक्तीने पोलिसांना सांगितलं की तो आपला उदरनिर्वाह करण्यासाठी धडपडत आहे. त्यामुळे गुन्ह्यासाठी तुरुंगात खितपत पडल्यानंतर त्याला नियमित जेवण मिळेल अशी आशा असल्याने त्याने अधिकाऱ्यांना हा फोन केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना काही दिवसांपूर्वी चेन्नई येथील पोलीस नियंत्रण कक्षात एक कॉल आला होता, ज्याने इरोड पोलिसांना शहरातील मुख्य बसस्थानक, रेल्वे स्थानक आणि शॉपिंग मार्केटमध्ये सुरक्षा उपाय कडक करण्याचा इशारा दिला होता.

    इरोड पोलिसांनी इरोड रेल्वे स्थानक, इरोड महानगरपालिका बसस्थानक आणि बाजारपेठ परिसराची कसून तपासणी केली. परंतु, काहीही सापडलं नाही आणि ही केवळ अफवा असल्याचं म्हटलं. कॉल रेकॉर्डची पडताळणी केल्यावर, कॉलर संतोष कुमार हा कोईम्बतूर जिल्ह्यातील मेट्टुपालयम येथील रहिवासी असल्याचे पोलिसांना आढळले. इरोड पोलिसांनी शनिवारी रात्री कुमारला अटक करून चौकशी केली.


    पोलिसांनी सांगितलं की 2019 आणि 2021 मध्ये कुमारने अशाच प्रकारे फोन कॉलद्वारे बनावट माहिती दिली होती. भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, कुमारचा जबाब नोंदवल्यानंतर त्याला रविवारी न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर करण्यात आले, तेथून त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

    Post a Comment

    0 Comments