एका तरुणानं पुणे शहरात (Pune city) प्ले बॉय (playboy) होण्याच्या नादात लाखो रुपये गमावल्याची घटना घडली आहे. मूळचा सोलापूरच्या या तरुणानं दिवंगत वडिलांच्या सेवानिवृत्तीचे तब्बल 17 लाख 38 हजार रुपये ऑनलाईन गमावले आहेत. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तसंच पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तरुणाला फेसबुकवर प्लेबॉय कंपनीचे लायसन्स काढण्यासाठी आणि रजिस्ट्रेशन काढून देतो असं खोटं सांगण्यात आलं होतं. तासाला तीन हजार रुपये कमावता येतील हे ऐकताच त्याने फोन पे मार्फत वेगवेगळ्या अकाऊंटवर 17 लाख रुपये पाठवले. त्यानंतर मात्र काही पैसे मिळाले नसल्याचं लक्षात आल्यावर आपली फसवणूक झाल्याचं कळताच तरुणानं पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार केली.
याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दयाशंकर मिश्रा, रागिणी, विक्रम सिंग या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक केली नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तवाडी परिसरात राहणाऱ्या एका उच्चशिक्षित पदवीधर तरुणानं प्लेबॉय होऊन दररोज तीन हजार रुपये कमवा, अशी जाहिरात सोशल मीडियावर पाहिली. त्यानंतर त्यानं त्या कंपनीच्या वेबसाईटवर नोंदणी केली. नोंदणी केल्यानंतर लायसन्स फी, रुम भाडे, पोलीस व्हेरिफिकेशन, पिकअप ड्रॉप, लेट फी, पॉलिसीची रक्कम आणि त्याचे विलंब शुल्क अशी वेगवेगळी कारणे सांगत या तरुणाकडून ऑनलाईन 17 लाख रुपये घेतले.
धक्कादायक म्हणजे या तरुणानं बँकेतून निवृत्त झालेल्या दिवंगत वडिलांच्या सेवानिवृत्तीचे पैसे टप्प्याटप्प्यानं खात्यात भरले. दुसरं म्हणजे या तरुणानं घरी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असल्याचं सांगितलं.
तब्बल 17 लाख 38 हजार 882 रुपये भरल्यानंतर आरोपींना कामाचं काय झालं असं विचारलं. मात्र त्यानंतर समोरुन उडवाउडवीची उत्तरं मिळाली. त्यानंतर त्यानं पोलिसांत तक्रार केली.

0 Comments