-->

Ads

रानुडक्कराच्या शिकाराची किंमत जीव गमावून चुकवली! कारवाई होताच आरोपीनं उचललं धक्कादायक पाऊल

रानडुकराची शिकार करून मांस विक्री करताना रंगेहात पकडण्यात आलेल्या आरोपीने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली आहे (Suicide Case). ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील दिघोरी येथे घडली आहे. 54 वर्षीय राजाराम मेश्राम असं मृत व्यक्तीचं नाव आहे. त्याच्यावर रानडुक्कराची शिकार करुन मांस (Pork) विक्री केल्याप्रकरणी वनविभागाने गुन्हा नोंद केला होता.

गुन्ह्याअंतर्गत वनविभागाने आरोपीला सूचनापत्रावर सोडलं होतं. ही घटना गुरुवारी उघडीस आली. 26 मार्च रोजी स्थानिक दिघोरी मोठी जंगल परिसरात राजाराम मेश्राम या व्यक्तीला रानडुकराचे मांस विकताना वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडलं होतं. यावेळी वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मृतक आरोपीकडून 20 किलो रानडुकराचे मांस व अन्य मुद्देमाल जप्त करीत त्याच्याविरोधात गुन्हा नोंद केला होता. सूचनापत्रावर त्याला सोडून देण्यात आलं होतं.

दरम्यान, मद्यपी असलेल्या मृतकाने या घटनेनंतर मद्यधुंद अवस्थेत विष प्राशन केलं. गावातील शेतशिवारात जाऊन त्याने विष प्राशन केलं आणि गुरुवारी तो मृतावस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती दिघोरी मोठी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. याप्रकरणी दिघोरी मोठी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments