-->

Ads

कोलकत्त्याचे Wow Momos पडले 12 लाखांना; औरंगाबादेतील व्यावसायिकासोबत घडला विचित्र प्रकार

 

औरंगाबाद (Aurangabad) शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील हॉटेल व्यावसायिकासोबत एक विचित्र प्रकार घडला आहे. मोमोजचा व्यवसाय करण्याचा विचार त्यांना चांगलाच महागात पडला आहे. कोलकत्त्यातील 'वॉव मोमोज'ची  फ्रेंचायजी (wow momo franchise) देण्याच्या नावाखाली त्यांना ऑनलाईन गंडा (Online fraud) घालण्यात आला आहे. पण गूगलवर बारकाईने तपास केला असता संबंधित कंपनीचं संकेतस्थळ बनावट असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला जात आहे.

कैलास लक्ष्मणदास तलरेजा असं फसवणूक झालेल्या 45 वर्षीय हॉटेल व्यावसायिकाचं नाव आहे. औरंगाबाद शहरातील सिंधू कॉलनीत त्यांचं हॉटेल आहे. तलरेजा यांचा बीएचआर इंडियन फूड नावानं व्यवसाय आहे. डिसेंबर 2021 मध्ये त्यांना फेसबूकवर कोलकत्याच्या 'वॉव मोमोज'बद्दल माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी गूगलवरून कंपनीची माहिती मिळवत ई-मेलवर संपर्क साधला. तसेच औरंगाबादेत वॉव मोमोजची शाखा सुरू करण्याची प्रक्रिया विचारली.

त्यानंतर आरोपींनी फिर्यादी तलरेजा यांच्याकडून बँक पासबूक, आाधार कार्ड, पॅनकार्ड, शहर आणि शिक्षणाविषयी माहिती विचारली. तसेच त्यांच्याकडून रजिस्ट्रेशन फॉर्म भरून घेतला. यानंतर आरोपींनी 6 डिसेंबर रोजी फ्रेंचायजी घेण्यासाठी 8 लाख रुपये द्यावे लागतील, असं सांगितलं. तसेच हे पैसे काही दिवसानंतर परत मिळतील, असंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर आरोपींनी वेळोवेळी विविध कारणं देत फिर्यादीकडून 11 लाख 96 हजार लुबाडले आहे. आारोपींनी फिर्यादीचा एवढा विश्वास संपादन केला होता की त्यांनी आपल्या गाडीचा अपघात झाल्याचं सांगत, 2 लाख 25 हजार रुपये उसने मागितले होते.

'वॉव मोमोज' फ्रेंचायजी मिळवण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही कंपनीकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं फिर्यादी तलरेजा यांनी गूगलवर संबंधित वेबसाईट काळजीपूर्वक पाहिली. त्यानंतर संबंधित वेब साईट बनावट असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तलरेजा यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आर्थिक फसवणुकीसह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संजीव कुमार, श्रीवास्तव आणि संदीप कश्यप असं गुन्हा दाखल झालेल्या तीन आरोपींची नावं आहेत.

Post a Comment

0 Comments