रतन चोरघडे आणि शिवाजी चोरघडे असं मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या दोघांची नावं आहेत. संबंधित दोघांवर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत विलास एकनाथ चोरघडे आणि प्रविण विलास चोरघडे या दोघांना अटक केली आहे. याशिवाय अनिल एकनाथ चोरघडे, तुषार विलास चोरघडे, ओंकार अनिल चोरघडे, शुभम अनिल चोरघडे आणि राहुल रंगनाथ चोरघडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विजय मफाजी चोरघडे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय आणि विलास चोरघडे एकमेकांचे नातेवाईक असून वडिलोपार्जित जुन्या विहिरीतील पाण्यावरून दोघांत वाद आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून त्याच्यांत हा वाद आहे. घटनेच्या दिवशी गुरुवारी सकाळी देखील विहिरीच्या पाणी वाटपावरून दोन्ही कुटुंबात वाद झाला होता. याच वादातून आरोपी विलास यानं आपल्या काही साथीदारांच्या मदतीनं विजय आणि इतरांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात आरोपी तुषार याने रतनच्या डोक्यात विळ्याने वार करत त्याला रक्तबंबाळ केलं आहे. दरम्यान विजय यांचा भाऊ शिवाजी भांडणं सोडवण्यासाठी मध्ये गेला. यावेळी संतापलेल्या अनिलने शिवाजी यांच्या गळ्यावर आणि पाठीवर कुदळने वार केले. यामध्ये शिवाजी गंभीर जखमी झाले आहेत.
दुसऱ्या तक्रारीवरून, रतन चोरघडे, वैभव चौरघडे, विजय चोरघडे, शिवाजी चोरघडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला चहा घेऊन शेतात जात असताना दीर ओंकार चोरघडे यांना आरोपी मारहाण करत होते. यावेळी फिर्यादी महिला भांडण सोडवण्यासाठी गेली असता आरोपी विजय यानं त्यांना शिवीगाळ केली. तर रतनने लाथ मारल्यामुळे महिलेच्या हाताला दुखापत झाली आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
0 Comments