ठाण्यातील (Thane) नीळकंठ वडूस परिसरात एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. येथील एका दहावीत शिकणाऱ्या मुलानं आई वडिलांच्या डोळ्यादेखत 19 व्या मजल्यावरून उडी मारली (10th class student jump from 19 floor) आहे. ही धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली आहे. या घटनेची माहिती चितळसर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
ओम मनीष मिश्रा असं आत्महत्या करणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलाचं नाव आहे. तो ठाण्यातील रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होता. मृत ओमची सध्या शालांत परीक्षा सुरू होती. घटनेच्या दिवशी 26 मार्च रोजी तो विज्ञानाचा पेपर देऊन घरी परतला होता. परीक्षा देऊन घरी आल्यानंतर वडिलांनी अभ्यास कर, असा सल्ला दिला होता. हा सल्ला त्याच्या जिव्हारी लागला.
याच रागातून त्यानं आपल्या आई वडिलांच्या डोळ्यादेखत थेट 19 व्या मजल्यावरून खाली उडी मारली. या दुर्दैवी घटनेत ओमच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. हा धक्कादायक प्रकार घडताच, ओमच्या आई वडिलांनी तातडीने खाली धाव घेतली. त्यांनी ओमला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

0 Comments