Murder in Chandrapur: चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात एक थरारक घटना घडली आहे. येथील एका व्यक्तीने धारदार कुऱ्हाडीने घाव (Attack with axe) घालून आपल्या पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं आहे.
आरोपीनं पतीने हे टोकाचं पाऊल नेमकं कोणत्या कारणातून उचचलं याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. योगिता बावणे असं मृत पावलेल्या 35 वर्षीय महिलेचं नाव आहे. तर 42 वर्षीय आरोपी पती राजू बावणे याच्यावर गोंडपिंपरी येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित दाम्पत्य चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिंपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, घटनेच्या दिवशी शनिवारी रात्री पती आणि पत्नीमध्ये कोणत्या तरी कारणातून वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर, आरोपी पतीने धारदार कुऱ्हाडीने पत्नी योगिता यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. आरोपीनं योगिता यांच्यावर कुऱ्हाडीने गंभीर घाव घातल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती राजू याने देखील विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
रात्री उशिरा घडलेल्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी गोंडपिंपरी पोलिसांना पाचारण केलं. यानंतर दोघांनाही गोंडपिंपरी येथील रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत पत्नी योगिता यांचा मृत्यू झाला होता. तर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पती राजू बावणे यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. त्यांच्यावर गोंडपिंपरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
0 Comments