अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील काही चिकन विक्रेत्यांनी निकृष्ट दर्जाचे चिकन स्वस्त दरात विकून रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण केला आहे. या लोकांनी शहरात आपली दुकाने उघडली आहेत. अंबरनाथ मटण व चिकन व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष किंवा पदाधिकारी त्यांना समजवायला गेले, तर ते त्यांच्याशी दादागिरीची भाषा करतात. अशी लेखी तक्रार मटण, चिकन विक्रेते युनियनने पोलिसांना देत या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संघटनेचे अध्यक्ष चांद चौधरी, सचिव कलाल चौधरी, नबी शेख यांनी सलीम एम. चौधरी, करीम चौधरी, अकबर चौधरी गौस, जमसू चौधरी यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार करताना वरील लोकांकडून त्यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले आहे. यासंदर्भात रविवारी मोरिवली योगाश्रम उद्यानात संघटनेच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत शहरातील मटण व चिकनचे 50 हून अधिक दुकानदार आजारी किंवा निकृष्ट दर्जाचे चिकन विकून ग्राहक व रहिवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचे सांगण्यात आले. हे लोक बाहेरील राज्यातून लोकांना शहरात आणून स्वत:च्या फायद्यासाठी व्यवसाय करत आहेत आणि इतर व्यापाऱ्यांची दुकाने बंद करू पाहत आहेत. असा आरोप संघटनेने केला आहे. पोलिसांना दिलेल्या पत्रात संघटनेने वरील लोक धमक्याही देत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या बैठकीला मेहबूब चौधरी, इस्माईल शेख, वजीर, पांडुरंग दसर, शब्बीर सय्यद, बाबू, जहांगीर चौधरी आदी दुकानदार उपस्थित होते.
0 Comments