अंबरनाथमधील मोबाईल दुकान फोडून दुकानातील विविध कंपन्यांचे सुमारे 15 लाखांचे मोबाईल चोरून नेणाऱ्याला पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत साडे दहा लाखांचे मुद्देमालासह अटक केल्याची माहिती झोन चारचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली.
या प्रकरणी अंबरनाथच्या पश्चिमेकडील मोहन नॅनो परिसरात राहणाऱ्या महमद फिरोज नईम अहमद याला अंबरनाथ पोलिसांनी अटक केली.
अंबरनाथच्या पश्चिमेकडील राजेश मोबाईल या दुकानातून फिरोज याने विविध कंपन्यांचे सुमारे साडे चौदा लाख रुपयांचे मोबाईल 2 ऑक्टोबरच्या मध्यरात्री दुकानाचे छत तोडून चोरून नेले होते. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा घडला त्याठिकाणी हेकसा ब्लेड, पक्कड सारख्या वस्तू आढळून आल्या होत्या. या वस्तूंच्या आधारे आरोपीच्या मुसक्या आवळल्याचे पोलिसांनी सांगितले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली छडा लावून महमद फिरोज नईम अहमद याला बुधवार 5 ऑक्टोबर रोजी अटक केल्याची माहिती अंबरनाथ पोलिसांनी दिली. त्याच्याकडून 10 लाख पाच हजारांचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. न्यायल्याने त्याला 9 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली असल्याचे यावेळी उपायुक्त मोहिते यांनी सांगितले.
उस्मान शाह, अंबरनाथ

0 Comments