-->

Ads

आई-वडिलांनी जीव सोडला, मृतदेहांमधून अळ्या पडल्या तिथेच जिवंत बाळ आढळलं, पोलीसही हळहळले

हे बाळ सुखरूप असून पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीत आहे. तर, त्याच्या आई-वडिलांचे मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.


देहरादून, 14 जून : 4 दिवसांच्या नवजात बालकाच्या आजूबाजूला अळ्या पडलेले आई-वडिलांचे मृतदेह आढळल्याची अत्यंत दुर्दैवी घटना उत्तराखंडमधून समोर आली आहे. हे बाळ सुखरूप असून पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीत आहे. तर, त्याच्या आई-वडिलांचे मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. उत्तराखंडची राजधानी देहरादूनच्या क्लेमेंट टाऊन भागात ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, एका घराच्या माळ्यावर हे कुटुंब 4 महिन्यांपासून भाड्याने राहत होतं. मागील काही दिवसांपासून त्यांचं घर बंदच होतं आणि घरातून अतिशय घाण वास येत होता. आजूबाजूच्या रहिवाशांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर घराचा दरवाजा आतल्या बाजूने बंद होता आणि आत जाण्यासाठी कोणताही पर्याय नव्हता. त्यामुळे दरवाजावरची जाळी तोडून पोलीस आत शिरले. आतलं दृश्य पाहून पोलीसही हादरले. नवरा-बायकोचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. दोन्ही मृतदेहांवर अळ्या फिरत होत्या आणि घाण वास येत होता. या दोन मृतदेहांमध्ये एक जिवंत नवजात बाळ रडत होतं. पोलिसांनी सर्वात आधी या बाळाला उचललं आणि रुग्णवाहिकेतून दून रुग्णालयात धाडलं. त्यानंतर दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. आता पोलिसांना अहवालांची प्रतीक्षा आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, या पती-पत्नीने आत्महत्या केली आहे कारण त्यांच्या केवळ नाकातून रक्त येत होतं. त्याव्यतिरिक्त शरीरावर कुठेही जखमा नाहीत. तसेच त्यांच्या घरातील सामानही जसंच्या तसंच आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांचं घर आतून बंद होतं.

काशिफ आणि अनम असं या नवरा-बायकोचं नाव असून त्यांच्यावर 5 लाख रुपयांचं कर्ज होतं. जे 10 जूनपर्यंत फेडायचं होतं. याच कारणातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, अनम ही काशिफची दुसरी पत्नी होती. त्याचं पहिलं लग्न सहा वर्षांपूर्वी झालं होतं. त्याला 5 वर्षांचा एक मुलगाही आहे. मात्र तो त्याच्याच गावात राहणाऱ्या अनमच्या प्रेमात पडला होता. अनमलाही त्याच्याशीच लग्न करायचं होतं. परंतु या लग्नाला कुटुंबियांचा आणि गावकऱ्यांचा प्रचंड विरोध होता. गावकऱ्यांनी बैठकांवर बैठका घेऊन अखेर एका वर्षापूर्वी त्यांचं लग्न लावून दिलं होतं. लग्नानंतर कुटुंबीय त्यांच्याशी बोलायचे नाहीत, मात्र काशिफची पहिली पत्नी नुसरत काही दिवसांपासून त्याला फोन करत होती परंतु सोमवारी त्याचा फोन बंद झाला. तर, काशिफ-अनमच्या मृत्यूबाबत कळल्यानंतर त्याचे कुटुंबीय दाखल झाले परंतु अनमचे कुटुंबीय आले नाहीत. 

शुक्रवारी एका खासगी रुग्णालयात अनमची डिलिव्हरी झाली होती, त्यानंतर काशिफ दोघांना घेऊन घरी आला होता. मुलाचा जन्म होताच आई-वडिलांनी इतकं टोकाचं पाऊल उचलल्यानंतर हे काही दिवसांचं बाळ अनाथ झालं आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून बाळाबाबत चिंता व्यक्त होत आहे.
Post a Comment

0 Comments