राज्यातील विविध भागात पावसाने थैमान घातले आहे. राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहेत. अनेक नद्यांना पूर आले असल्यामुळे पूरपरिस्थितीही निर्माण झाली आहे. यातच आता हवामान खात्याने राज्यातील पावसासंदर्भात एक महत्त्वाचा इशारा दिला आहे.
राज्यात पावसाने कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात थैमान घातले आहे आहे. मागच्या 24 तासांता कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा येथे सर्वाधिक 330 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी 200 मिलिमीटपेक्षा जास्त पाऊस पडल्याने नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. (सर्व फोटो सोशल मीडिया)
यानंतर हवामान खात्याने आणखी एक इशारा दिला आहे. हवामान खात्याकडून राज्यातील पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर या भागात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याचबरोबर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबार, कोल्हापूर, अकोला, अमरावती, गोंदिया या भागात येलो अलर्ट देण्यात आला आहे.
खानदेशात दोन दिवसांपासून मध्यम ते जोरदार पाऊस झाला. काही भागांत नाल्याकाठच्या जमिनी खरडून गेल्या. नाशिक जिल्ह्यात सटाणा व मालेगाव तालुक्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. शेतजमिनींसह पिकांचे मोठे नुकसान झाले. खरिपाच्या पिकांसह डाळिंब, पूर्वहंगामी द्राक्ष बागांना फटाका बसणार आहे.
मराठवाड्यातील हिंगोली, परभणी जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस झाला. हिंगोली, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यातील अनेक मंडळांत पावसाचा जोर होता. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यात पावसाचे सत्र सुरूच आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.
तर पुणे जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे. वीर, भामा आसखेड दोन धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माढा तालुक्यात पावसाने हजेरी लावली.

0 Comments