Murder in Nashik: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव याठिकाणी एका तरुणानं आपल्या दोन मेहुण्यांवर चाकुने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात एका मेहुण्याचा दुर्दैवी अंत झाला आहे.
याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. मोहंमद अहमद मुईयुद्दीन असं हत्या झालेल्या 30 वर्षीय मेहुण्याचं नाव आहे. तर पोलिसांनी संशयित आरोपी मोहंमद इम्रान गनी याला अटक केली आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.
लिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी मोहंमद इम्रान उस्मान गनी हा मालेगावातील हबीमुल्ला मशिदीजवळील नवरंग कॉलनी परिसरातील रहिवासी आहे. आरोपी गनी हा रागीट स्वभावाचा असून तो नेहमीच आपल्या पत्नीला मारहाण करून त्रास देतो. घटनेच्या दिवशी शनिवारी देखील त्यानं आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली होती. आरोपीच्या सततच्या मारहाणीला कंटाळलेल्या पत्नीनं आपल्या भावांना बोलावून घेतलं. बहिणीचा वाद मिटवण्यासाठी मोहंमद अहमद मुईयुद्दीन आणि मोबीन अहमद बहिणीच्या घरी आले होते.
यावेळी त्यांनी आपले दाजी गनी याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. दरम्यान वाद वाढत गेला अन् संतापलेल्या गनीनं घरातून दोन चाकू आणून मोबीनच्या तोंडावर वार केला. भावाला वाचवण्यासाठी मोहंमद मध्यस्थी करायला गेला. यावेळी आरोपीनं हातातील चाकू मोहंमदच्या पोटावर डाव्या बाजूला खूपसला. हा वार इतका भयंकर होता की चाकू थेट बरगड्यांपर्यंत जाऊन पोहोचला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोहंमदला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी उपचार सुरू असताना मोहंमदची प्राणज्योत मालवली आहे. या हल्ल्यानंतर आरोपी गनीनं स्वत:वर वार करून जखमी करून घेतलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.
0 Comments