हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातील राजदरी याठिकाणी हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका महिलेनं पतीच्या मारहाणीला कंटाळून विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण विष प्राशन करताच त्यांना अचानक आश्रमशाळेत शिकणाऱ्या आपल्या मुलांची आठवण येऊ लागली. त्यामुळे त्यांनी अखेरच्या वेळी मुलांना पाहण्यासाठी विष प्राशन केल्याच्या स्थितीत पायपीट करत मुलांची शाळा गाठली. आईची अवस्था पाहून मुलांनी ओक्साबोक्सी रडायला सुरुवात केली.
हा प्रकार शाळेच्या मुख्याध्यापकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने प्रसंगावधान दाखवत काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं महिलेला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. याठिकाणी प्राथमिक उपचार घेतल्यानंतर रुग्णवाहिका बोलावून त्यांना पुढील उपचारासाठी औंढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी त्यांच्यावर उपचार केले जात असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
याठिकाणी गेल्यानंतर त्यांनी आपल्या तिन्ही मुलांची भेट घेतली. तसेच मी विष घेतलं असून मी आता मरणार आहे, असंही त्यांनी आपल्या मुलांना सांगितलं. हा प्रकार कळाल्यानंतर तिन्ही मुलांनी आईला बिलगून ओक्साबोक्शी रडायला सुरुवात केली. याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक हनुमंत बचाटे यांना मिळाली. त्यांनी त्वरित याची माहिती सामाजिक कार्यकर्ते बापूराव घोंगडे यांना दिली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या काही मित्रांना घेऊन पिंपरदरीची शाळा गाठली. अखेरच्या घटका मोजणाऱ्या सुवर्णमाला यांना रुग्णालयात दाखल केलं. सध्या सुवर्णमाला यांच्यावर औंढा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केले जात असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
0 Comments