विविध खाजगी आणि सरकारी बँकांच्या एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी मागील वर्षभरात एटीएममधून तब्बल सव्वा कोटी रुपये लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी गेल्या वर्षभरात थोडे-थोडे करून तब्बल 1 कोटी 16 लाख 80 हजार रुपये (1.17 crore fraud) एटीएममधून काढून घेतले आहेत. एटीएम मशीनचं ऑडिट केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल (FIR Lodged) करण्यात आला आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस याचा तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी व सरकारी बँकांच्या एटीएम सेंटरमध्ये रोख रक्कम टाकण्याचं कंत्राट खासगी कंपन्यांना दिलं जाते. सिक्युअर व्हॅल्यू इंडिया लिमिटेड या कंपनीला देशभरातील राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत रोख मिळते. संबंधित रक्कम एटीएम सेंटरमध्ये टाकण्याची जबाबदारी या कंपन्यांकडे असते. याचा लेखाजोखा लोकेशन इन्चार्ज यांच्याकडे जमा असतो. तसेच दर तीन महिन्यांनी एटीएमचं ऑडिट केलं जातं. दरम्यान औरंगाबादेतील काही एटीएममध्ये एक कोटी 16 लाख 80 हजार रुपयांची अफरातफर आढळून आली.
या घोटाळ्यात योगेश पुंजाराम काजळकर (रा. सरस्वती कॉलनी, भीमनगर), सचिन एकनाथ रंधे (रा. जटवाडा रोड, हर्सूल), अविनाश ज्ञानेश्वर पडूळ (रा. पडूळ गल्ली, लाडसावंगी ), सिद्धांत रमाकांत हिवराळे (भीमपुरा, उस्मानपुरा), अमित विश्वनाथ गंगावणे (रा. भीमनगर, भावसिंगपुरा), अनिल अशोक कांबळे (भावसिंगपुरा), बाबासाहेब श्यामराव अंभुरे (रा. रामनगर), संजय भालचंद्र जाधव (रा. वाळूज) यांचा सहभाग असल्याचं कंपनीच्या अहवालात स्पष्ट झालं आहे. उपशाखा अधिकारी रमेश रायभान साठे यांच्या फिर्यादीवरून संबंधित आरोपींविरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित आरोपींनी मागील वर्षभरात एटीएममध्ये पैसे भरताना हळूहळू कमी टाकायला सुरुवात केली होती. संबंधित प्रकार ऑडिटमध्ये उघडकीस येऊ नये म्हणून आरोपी आपल्याजवळील रक्कम एटीएममध्ये वळवायचे. ऑडिट पूर्ण होताच संबंधित रक्कम काढून घेतली जायची आणि दुसऱ्या एटीएममध्ये भरली जायची. त्यामुळे स्थानिक ऑडिटमध्ये हा प्रकार लवकर समजून आला नाही. पण या नियमित ऑडिटव्यतिरिक्त कंपनीच्या मुंबईच्या पथकाकडून देखील एक ऑडिट केले जाते. 5 मार्च रोजी या पथकाने ऑडिट केलं असता, औरंगाबादेतील चार एटीएममधून 1 कोटी 16 लाख 80 हजार रुपयांची अफरातफर झाल्याचं पथकाच्या लक्षात आलं. यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिडको पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
0 Comments