-->

Ads

थरारक घटना! दबा धरून बसलेल्या बिबट्याने घेतला नरडीचा घोट; 23 वर्षीय तरुणीचा भयावह शेवट

 पुसद तालुक्यातील वडगाव शिवारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका 23 वर्षीय तरुणीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.


यवतमाळ, 27 डिसेंबर: यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या पुसद (Pusad) तालुक्यातील वडगाव शिवारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका 23 वर्षीय तरुणीवर प्राणघातक हल्ला (leopard attack on young woman) केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात संबंधित तरुणीचा जागीच मृत्यू (Young woman dead in leopard attack) झाला आहे. आसपासच्या परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या घटनास्थळावरून पसार झाला आहे. भल्या पहाटे बिबट्याने हल्ला केल्याची घटना उघडकीस येताच परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. संबंधित घटना आज (सोमवार) सकाळी पावणे सातच्या सुमारास घडली आहे.

शितल नागोराव शिंदे असं मृत पावलेल्या 23 वर्षीय तरुणीचं नाव असून ती पुसद तालुक्यातील वडगाव येथील रहिवासी आहे. संबंधित तरुणी आज (सोमवार) सकाळी पावणे सातच्या सुमारास गावातील मंदिरालगत असणाऱ्या शिवारात शौचासाठी गेली होती. दरम्यान मंदिरालगत असणाऱ्या एका झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तरुणीवर हल्ला केला आहे. बिबट्याने बेसावध असलेल्या तरुणीच्या थेट मानेवर हल्ला केला आहे.

 हल्ला इतका भयावह होता की तरुणी जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि यातच तिचा मृत्यू झाला आहे. दरम्यान शेतशिवारात काम करणाऱ्या काही जणांनी हा प्रकार पाहिला आणि त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे घाबरलेला बिबट्या घटनास्थळावरून पसार झाला आहे. स्थानिक नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती वनविभागाला आणि खंडाळा पोलीस ठाण्याला दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे.

बिबट्याच्या या हल्ल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे सापळा लावून तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. तसेच मृत तरुणीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी, अशी मागणीही गावातील नागरिकांनी केली आहे. खंडाळा पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments