-->

Ads

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण, मुंबई पोलिसांवर युवा मंत्र्याचा दबाव?

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास CBIने करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेता पार्थ अजित पवार यांनी देखील केली आहे.


मुंबई, 31 जुलै: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. पोलिस तपासात राज्यातील एका युवा मंत्र्याचा दबाव असल्यामुळे मुंबई पोलीस निष्पक्ष चौकशी करू शकत नाहीत, असा आरोप भाजपचे आमदार अतुल भातखलकर यांनी केला आहे. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI)ने तात्काळ हाती घेऊन बॉलिवूडमधील माफियांचा पर्दाफाश करावा, अशी विनंती आमदार अतुल भातखलकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केली आहे.

आमदार भातखलकर यांनी सांगितलं की, सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास CBIने करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेता पार्थ अजित पवार यांनी देखील केली आहे. तसेच सुशांतची बहीण मितू सिंह हिने देखील मुंबई पोलिसांच्या तपासावर साशंकता व्यक्त केली आहे.

दुसरीकडे, सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला जाणार नाही, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. तपास करण्यासाठी मुंबई पोलीस सक्षम आहेत, असंही गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे. मात्र, आता याबाबत राज्यात वादंग उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, अभिनेता सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस तपास करत आहेत. प्रकरणी वेगाने सूत्र हलवण्यात येत आहेत. बिहार पोलिसांचं एक पथक मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून तळ ठोकून बसलं आहे. बिहार पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यात सुशांत सिंह राजपूतची बहीण मितू सिंह हिची बिहार पोलिसांनी तब्बल 4 तास चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. मितू हिने पोलिस चौकशीत धक्कादायक माहिती दिल्याचं समजतं.
बिहार पोलिसांनी गोरेगाव याठिकाणी एका अज्ञात ठिकाणी मितू सिंह हिचा जबाब नोंदवला. यात मितूने सर्वात आश्चर्यकारक बाब सांगितली ती म्हणजे, सुशांत सिंह राजपूतच्या फ्लॅटवर रिया चक्रवर्ती ब्लॅक मॅजिक करत होती. ही बाब मितूला सुशांत सिंहच्या घरी काम करणाऱ्या एका नोकराने सांगितली होती. तसेच सुशांतच्या आत्महत्येच्या 2 दिवसांपूर्वी सुशांत आणि रियामध्ये कडाक्याचं भांडण देखील झालं होतं, अशी माहिती मितूने पोलिसांना दिली आहे.

Post a Comment

0 Comments