पिंपरी-चिंचवडमध्ये एका धक्कादायक घटनेत, प्रियकराने वाढदिवसानंतर प्रेयसीची निर्घृण हत्या केली. वाकड येथील लॉजवर ही घटना घडली असून, प्रेयसीचे दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून प्रियकराने हे टोकाचे पाऊल उचलले.
नेमंक काय घडलं?
मेरी ही एका डी-मार्टमध्ये नोकरी करत होती. तर दिलावर हा हॉटेल व्यावसायिक आहे. सहा वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांची मैत्री झाली. पुढे त्याचे रूपांतर प्रेमात झाले. मेरीच्या वाढदिवसानिमित्त हे दोघे वाकड येथील एका लॉजवर भेटले होते. मेरीने १० ऑक्टोबर रोजी केक कापून वाढदिवस साजरा केला. मात्र त्यानंतर आरोपी दिलावरने तिच्यावर चाकू आणि ब्लेडने वार करत तिची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या चाकूने केक कापला, त्याच चाकूचा आणि ब्लेडचा वापर त्याने हत्येसाठी करण्यात आला. मेरी तेलगूचे तिसऱ्याच व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय दिलावरला आला. त्याच संशयाने त्यांच्या सहा वर्षांच्या प्रेमसंबंधाचा दुर्दैवी शेवट केला.
प्रेयसीची हत्या केल्यानंतर आरोपी प्रियकर दिलावर सिंग याने कुठेही पळून न जाता थेट कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावली. त्याने स्वत: गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. प्रेमसंबंधातील संशय हेच हत्येचे प्रमुख कारण असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड परिसर हादरला आहे.
जळगावात तरुणाला बेदम मारहाण
तर दुसरीकडे प्रेम प्रकरणाच्या संशयातून जळगाव शहरात एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची आणि त्याची दुचाकी पेटवून दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना जळगाव शहरातील मोहाडी रोड परिसरात घडली आहे. भुसावळ तालुक्यातील एक तरुण आपल्या मैत्रिणीसोबत मोहाडी रोडवरील एका दुकानाजवळ थांबला होता. त्यावेळी काही तरुणांनी त्यांना हटकले. त्यांची विचारपूस केली. प्रेम प्रकरणाचा संशय आल्याने या टोळक्याने संबंधित तरुणाला जबर मारहाण केली. मारहाणीनंतर तरुणाची दुचाकी देखील पेटवून देण्यात आली. जखमी तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
0 Comments