पोलिसांनी तपास केला असता महिलेचा मृतदेह शहरभर फिरवण्यामागील कारण समोर आलं.
कर्नाटकातील एका महिलेचा मृतदेह चार चाकी वाहनातून सांगली शहरात फिरवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी तपास केला असता महिलेचा मृतदेह शहरभर फिरवण्यामागील कारण समोर आलं. मात्र यावेळी गर्भलिंगनिदान केल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील चिकोडी भागात गर्भपातादरम्यान एका 32 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृत्यूचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नातेवाईक त्या महिलेच्या मृतदेहासह चार चाकीतून सांगलीत फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार सांगली शहर पोलिसांच्या सतर्कतेने उघडकीस आला आहे. या प्रकरणात सांगलीच्या बस स्थानक परिसरात सायंकाळी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मृतदेहाचा अधिक तपास करण्यासाठी शासकीय रुग्णालयात आणण्यात आलं आहे. दरम्यान मृत महिला मिरज तालुक्यातील एका गावची माहेरवाशी आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात तिचं सासर आहे, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. मृत महिलेचा पती सैन्य दलात आहे. तिला दोन मुले आहेत. ती गरोदर असल्याने घरातील नातेवाईकांनी काही दिवसापूर्वी एका रुग्णालयात गर्भलिंग चाचणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अहवाल मिळतात त्यांनी तातडीने गर्भपात करण्यासाठी कर्नाटकातील चिकुडी येथे महालिंगपूर गाठले. एका रुग्णालयात महिलेवर गर्भपाताची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर काही वेळाने तिचा मृत्यू झाला. मात्र अधिकाऱ्यांनी मृत्यू प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. मृत्यू प्रमाणपत्र नसल्यामुळे अडचण निर्माण होणार होती. दरम्यान मृत महिलेस चारचाकीत घालून तिचे नातेवाईक मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सोमवारी (27 मे) सांगलीत आले. त्यांच्यासमवेत मिरज तालुक्यातील एक डॉक्टरही होता, अशी माहिती सांगली पोलिसांना मिळाली आहे.
सांगली बस स्थानक परिसरात पोलिसांना एक चार चाकी थांबल्याचं निदर्शनास आलं. चार चाकी बाहेर थांबलेल्या व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी गाडीची पाहणी केली. त्यामध्ये महिलेच्या मृतदेहासोबत दोघेजण बसल्याचे दिसून आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत मृत महिलेच्या नातेवाईकांनी घडलेल्या प्रकार सांगितला. पोलिसांना देखील याचा धक्का बसला. पोलिसांनी मृत महिलेचा मृतदेह शासकीय रुग्णालयात नेला, रात्री उशिरापर्यंत वैद्यकीय अहवाल मिळू शकला नव्हता.
0 Comments