-->

Ads

मोठा निर्णय : पुण्यात लॉकडाऊन होणार नाही, मात्र संचारबंदीबाबत चर्चा सुरू

 Pune Lockdown News : निर्बंध कडक करण्यात येणार आहेत, अशी भूमिका अजित पवार यांनी या बैठकीत घेतल्याची माहिती समोर येत आहे.

पुणे, 2 एप्रिल : पुणे जिल्ह्यातील कोरोना (Pune District Coronavirus) परिस्थिती आणि प्रतिबंधक उपाययोजनांची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील कौन्सिल हॉल येथे सुरू आहे. बैठकीला स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. या बैठकीत लॉकडाऊनबाबत (No Lockdown in Pune) अजित पवार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे.

'पुण्यात लॉकडाऊन करू नये, अशी सर्व लोकप्रतिनिधींची मागणी आहे. त्यामुळे शहरात लॉकडाऊन करण्यात येणार नाही. परंतु कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक करण्यात येणार आहेत,' अशी भूमिका अजित पवार यांनी या बैठकीत घेतल्याची माहिती समोर येत आहे.

संध्याकाळी 6 नंतर शहरात संचारबंदी?


राज्यभरात कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याने राज्यभरात नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने घेतला आहे. त्यानंतर आता पुण्यात निर्बंध आणखी कडक करण्यासाठी संध्याकाळी 6 वाजल्यापासूनच संचारबंदी लागू करण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला असून त्यावर चर्चा सुरू आहे. अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही. मात्र असा निर्णय झाल्यास पुणेकरांना संध्याकाळी 6 नंतर अत्यावश्यक कामानिमित्त घराबाहेर पडता येणार नाही.

पुण्यातील गंभीर स्थिती

पुणे शहरात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस आणखी घट्ट होत आहे. दिवसाला 4 हजारांहून अधिक बधितांची नोंद होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. डब्लिंग रेट सुद्धा 49 दिवसांवर आला आहे. तर मृत्यू दर 1.95 टक्क्यांवर आहे. शहरात 35 हजार 849 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तसंच बरे होण्याचं प्रमाण 85 टक्क्यांवर आले आहे.

शहरात कोरोनाचा संसर्गात झपाट्याने वाढ होत असून सोसायटीच्या इमारतीत मोठ्या संख्येने रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्यामुळे शहरात एकूण 268 कंटेन्मेंट झोन तयार झाले असून यामध्ये 115 इमारती तर 111 सोसायटी यांचा समावेश आहे.

एकीकडे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना पोलिसांकडून मास्क न घालणाऱ्याविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. शहरातील कोरोना संसर्ग कसा आटोक्यात आणायचा यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे, मात्र रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव घेत नाही, त्यामुळे आगामी काळात आणखी कडक निर्बंध केले जाण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments