सकाळी आठच्या सुमारास कामावर जाण्यासाठी ती फातिमानगर बसस्टॉपवर उभी होती. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती तिथे आली.
पुणे, 04 ऑगस्ट : पुण्यात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका 45 वर्षीय महिलेला अज्ञात ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अत्याचार केल्यानंतर नराधमाने महिलेचे 1 लाख रुपये किंमतीचे दागिनेही लुटून पसार झाला आहे.
पुण्यातील मुंढवा परिसरात आज सकाळी ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही घरकाम करत असून ती सांगवी परिसरात राहते. सकाळी आठच्या सुमारास कामावर जाण्यासाठी ती फातिमानगर बसस्टॉपवर उभी होती. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती तिथे आली आणि तिने लोणी परिसरात सोडतो, असं सांगितले. आधीच लॉकडाउन असल्यामुळे वाहनं लवकरच मिळत नाही. त्यामुळे या महिलेनं अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि त्याच्या दुचाकीवरून लोणीकडे जाण्यास तयार झाली.
परंतु, प्रवास करत असताना या नराधमाने महिलेशी जवळीक साधली. त्याने आपले ऑफिस दाखवण्याच्या बहाण्याने महिलेला मुंढवा परिसरात घेऊन गेला. मुंढवा परिसरात गेल्यानंतर या नराधमाने महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केले. त्याचबरोबर या महिलेच्या अंगावर असलेले एक लाख रुपये किंमतीचे दागिने घेऊन पसार झाला.
पीडित महिलेनं पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून आपल्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून या महिलेनं रितसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी या महिलेकडून माहिती जाणून घेतली. घटना ही मुंढवा परिसरात घडल्यामुळे गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितेला मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये पाठवण्यात आले. त्यानुसार मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मुंढवा पोलीस करत आहे.

0 Comments