-->

Ads

OLX वर 20 हजारांत दुचाकी खरेदी करण्याच्या नादात गेले 70 हजार रुपये; पुणेकर महिलेची फसवणूक

  

डिजिटल तंत्रज्ञान आणि इंटरनेटची सुविधा यामुळे आजकाल ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping) मोठ्या प्रमाणात केलं जातं. ऑनलाईन शॉपिंगच्या जगातली अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट ही काही मोठी नावं आहेत; मात्र अशा अनेक इतर वेबसाईट्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील खरेदी-विक्रीचे व्यवहार केले जातात. या ऑनलाईन शॉपिंगदरम्यान अनेकदा फसवणुकीच्या घटनादेखील घडतात. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. ऑनलाईन दुचाकी खरेदी (Buying Car Online) करणं पुण्यातल्या एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. OLX वेबसाईटवर (OLX Website) दुचाकी विकण्याची जाहिरात पोस्ट करून एका भामट्याने या महिलेची 71,000 रुपयांची फवसणूक केली आहे. याप्रकरणी संबंधीत महिलेने शुक्रवारी (27 मे) देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehuroad Police Station) तक्रार दाखल केली असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. 'द इंडियन एक्सप्रेस'ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या (Police Officials) माहितीनुसार, तक्रारदार महिलेने ओएलएक्स वेबसाईटवर दुचाकी विक्रीसंदर्भातली जाहिरात पाहिली आणि गुरुवारी (26 मे) सकाळी त्यामध्ये नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. यानंतर महिला आणि जाहिरातदार व्यक्ती यांच्यात वाटाघाटी झाल्यानंतर महिलेने 20,000 रुपयांना दुचाकी खरेदी करण्याचं मान्य केलं. पण जाहिरातदाराने तक्रारदार महिलेला तब्बल 71,060 रुपयांना फसवलं. शिवाय त्याने तिला दुचाकीदेखील दिली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक ए. आर. जाधव (API A. R. Jadhav) यांनी सांगितलं, की 'फसवणूक करणाऱ्याने तक्रारदार महिलेला कमी किमतीत दुचाकी विकण्याचं आमिष दाखवलं. त्यानंतर त्याने तिला बँक खात्यात थोडी रक्कम ट्रान्स्फर करण्यास सांगितलं. त्यानंतरही त्याने तिला वेगवेगळी कारणं देऊन आणखी काही पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगितलं. ते पैसे नंतर मिळतील आणि वाहनही मिळेल, असंही त्याने सांगितलं. पण महिलेला वाहन तर मिळालं नाहीच आणि तिला तिचे पैसेदेखील परत मिळाले नाहीत.' याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, अनेकदा वेगवेगळ्या आणि माहिती नसलेल्या वेबसाईट्सद्वारे देण्यात येणाऱ्या आकर्षक ऑफरला ग्राहक बळी पडतात आणि त्यामुळे त्यांची फसवणूक होते. त्यामुळे ग्राहकांनी कोणतीही वस्तू ऑनलाईन खरेदी करताना काळजीपूर्वक आणि माहिती असलेल्या वेबसाईटच्या माध्यमातून खरेदी करणं गरजेचं आहे. जागरूक राहून ऑनलाईन व्यवहार केल्यास असे फसवणुकीचे प्रकार टाळता येऊ शकतात.

Post a Comment

0 Comments