शाब्दिक वाद काही वेळातच हत्येपर्यंत गेला. हल्लेखोरांनी या चारही मयतांचा पाठलाग करून हत्या केल्याचं समोर येत आहे.
अहमदनगर, 20 ऑगस्ट : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाटा इथे आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास चार जणांची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येचे कारण आणि हल्लेखोर कोण होते हे अद्याप स्पष्ट झालं नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नातीक कुंज्या चव्हाण वय-40, श्रीधर कुंज्या चव्हाण वय-32, नागेश कुंज्या चव्हाण- 20 रा. सुरेगाव व लिंब्या हबऱ्या काळे वय-22 रा. देऊळगाव सिद्धी ता. नगर अशी हत्या झालेल्या चौघांची नावं आहेत. तपासात समोर आल्यानुसार सुरेगाव इथल्या मयत व्यक्तींचा आणि अन्य काही लोकांचा गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता.
हे दोन्ही गट आज सायंकाळच्या सुमारास विसापूर फाटा इथे आमने-सामने आले. शाब्दिक वाद काही वेळातच हत्येपर्यंत गेला. हल्लेखोरांनी या चारही मयतांचा पाठलाग करून हत्या केल्याचं समोर येत आहे. या चार जणांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी पडले होते.
बेलवंडी पोलिसांना याबाबत माहिती समजताच पोलीस निरीक्षक अरविंद माने आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. चारही मृतदेह शोधण्यात पोलीस यंत्रणेचा वेळ गेला. पोलिसांनी हे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी श्रीगोंदा इथे पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, या चौघांची हत्या कोणी केली, हत्येपाठीमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांनी भेट देऊन पहाणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून सुरेगाव परिसरात पोलीस कुमक तैनात करण्यात येणार आहे.

0 Comments